वडगाव मावळ, ता.१६: मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्टोबर महिन्यामध्ये मोरया प्रतिष्ठान व लक्ष्य फाऊंडेशनच्या वतीने वडगाव शहरातील दिव्यांग बांधवांसाठी मोफत दिव्यांग नावनोंदणी अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात आपल्या वडगाव शहरातून १३ दिव्यांग बांधवांनी नावनोंदणी केले. मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना आज अत्याधुनिक व्हिलचेअर, कुबडी, वाॅकर, स्टिक आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या व्यतिरिक्त शहरातील दिव्यांग बांधवांना इतर अत्यावश्यक असलेले साहित्य येत्या काही दिवसांत वाटप करण्यात येईल असे आश्वासन माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिव्यांग बांधवांना दिले. आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसाच्या कालावधीत मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरात विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने वडगाव मधील ठाकर समाजातील कुटुंबीयांचे जातीचे दाखले, वारकरी संप्रदायासाठी भजन स्पर्धा, महिला भगिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा, विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्य वाटप, सर्व सामान्यांसाठी आयुषमान भारत योजना, दंत तपासणी इत्यादी समाजोपयोगी उपक्रम राबविन्यात आले.

